11 वी (CET) सीईटीच्या परीक्षेसाठी आज दुपारी 3 वाजतापासून अर्ज सुरू : 2 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येतील

 

11 वी (CET) सीईटीच्या परीक्षेसाठी आज दुपारी 3 वाजतापासून अर्ज सुरू : 2 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येतील

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आज (ता.२६) दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता.२८) अर्ज करता येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असून ती ऑफलाइन स्वरूपाची असून राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. विद्यार्थ्यांना " 'https://cet.11thadmission.org.in '' या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंत सुविधा उपलब्ध राहणार आहे. राज्य मंडळाने रविवारी रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक काढले.

राज्य मंडळाने यापूर्वी २० जुलै रोजी अकरावी सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे २१जुलैला ही अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांनी अर्ज नोंदणीसाठी नव्याने यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्य मंडळाने जाहीर केलेल्या नव्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

यापूर्वी २० आणि २१ जुलै दरम्यान परीक्षेसाठी नोंदणी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून या संकेस्थळावर अर्ज पाहता येईल. यावेळी अर्ज पूर्णपणे सादर केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. मात्र यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावा लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामूळे अशा विद्यार्थ्यांना बुधवारपासून (ता. २८) परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून त्यासाठी दोन तासांचा कालावधी असेल. परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात निश्चित केलेल्या इंग्रजी आणि इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल.

प्रश्नपत्रिकेचे असे असेल स्वरूप

विषयाचे नाव : गुण

इंग्रजी : २५ गुण

गणित (भाग एक आणि दोन) : २५

विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक आणि दोन) : २५

सामाजिक शास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल : २५

एकूण : १००






Post a Comment

0 Comments