श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था दिवाळखोरीच्या वाटेवर ?
- संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी..
बल्लारपूर (राज्य रिपोर्टर) : बल्लारपूर शहरातील पतसंस्थेचा भोंगळ कारभार एकापाठोपाठ उघडकीस येऊ लागला आहे पंचाळ विश्वकर्मा पतसंस्था, प्रजासत्ताक पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असताना आता श्री बालाजी नागरी पत संस्था देखील ठेवीदारांना परतावा वेळेवर देत नसल्याने या संस्थेतही आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शंका दृढ होत चालली आहे.
मागील सहा महिन्यांपासून अनेक ठेवीदारांचे परतावे थकीत ठेवल्यामुळे ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे यासंदर्भात संस्थेच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असता कोणतेही समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून आले नसल्याने ही पतसंस्थाही दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
श्रीबालाजी नागरी पतसंस्था आपल्या सुरुवातीच्या काळातही दिवाळखोर झाली होती पुढे,शहरातील काही मान्यवरांनी संस्था हाती घेतली व सर्व व्यवहार पुन्हा रुळावर आणले होते. पण मधल्या काळात संचालक मंडळ बदलले त्या त्यानंतर संस्थेची प्रगती देखील खुंटली आता तोच इतिहास पुन्हा गिरवील्या जात असल्याचे जाणकार सांगतात.
पतसंस्थेकडून ठेवीदारांना मिळालेला धनादेशही बाउन्स होण्याचा संतापजनक प्रकार नुकताच पुढे आला आहे. खात्यात पैसे नसतानाही धनादेश देत ठेवीदारांचा मानसिक छळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न संचालकांकडून होत असल्याचे ग्राहकांकडून सांगितल्या जात आहे संस्थेच्या भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी तसेच संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोट्यावधी रुपयांची वार्षिक उलाढाल जनसामान्यांच्या कष्टाच्या कमाईवर होत असते परंतु पतसंस्थेतील संचालक पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या अभद्रयुतीतून स्वार्थापायी गोरगरिबांचा कष्टाचा पैसा बुडविला जातो. पुढे फक्त गुन्हे दाखल होतात चौकशी होते पण गरिबांचा पैसा मात्र परत मिळत नाही हिच वास्तविकता आणि दुर्दैव असल्याची शहरातील दिवाळखोर झालेल्या पतसंस्थेतील ठेवीदारांची संतप्त प्रतिक्रिया आहे.
0 Comments