शहरात अलगीकरण प्रक्रिया
आणखी सक्षम करा : ना.प्राजक्त तनपुरे
कोरोना योद्ध्यांची भूमिका महत्त्वपूर्ण
महानगरपालिकेत कोरोना विषयक आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 6 जुलै(राज्य रिपोर्टर) : कोरोनाचा प्रसार होत असताना महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी आहे. ही बाब समाधानकारक असली तरी शहरात अलगीकरण प्रक्रिया आणखी सक्षम करा.
बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची योग्य नोंद ठेवा. चंद्रपूर शहर तसेच जिल्हा कोरोना मुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिल्यात. महानगरपालिका चंद्रपूर येथे ना. प्राजक्त तनपुरे यांनी महानगरपालिकेतील विविध विषय व कोरोना बाबत आढावा बैठक घेतली. ते आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, गजानन बोकडे, सहायक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती राजुरवार, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ महावितरणचे सुनील देशपांडे, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिका अंतर्गत चंद्रपूर शहरातील कोरोना बाबतचा आढावा आयुक्त राजेश मोहिते यांनी सादर केला. बाहेरून शहरामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य आहे. तसेच विना परवानगीने बाहेरून आलेल्या नागरिकांवर कारवाई सुद्धा केलेली आहे. या विषयीची माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी यावेळी दिली.
दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यासाठी महानगरपालिकेने तसे नियोजन करावे. त्याचप्रमाणे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण, गृह अलगीकरण करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योध्दयांची भुमिका महत्वपूर्ण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयक माहिती तसेच या काळामध्ये नागरिकांकडे रोजगार उपलब्ध नसल्याने वीज बिल भरण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत. या वीज बिलाच्या समस्येवर लवकरच तोडगा काढावा. शहरासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याची मागणी यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांनी केली.
याविषयी बोलताना ना.प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांना आलेले वीज बिल तीन टप्प्यात भरण्याची मुभा असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांना वीज बिलाच्या तक्रारीसाठी महावितरणने दूरध्वनी क्रमांक जारी केलेले आहे. त्यामुळे या माध्यमातून नागरिकांच्या वीज बिला विषयीच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. निधीची कमतरता तसेच निधीचे समान वाटप इत्यादी विषयीच्या सूचना देखील उपस्थित नगरसेवकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडल्यात.
शहरातील सर्वच वार्डामध्ये निधीचे समान वाटप करावे, अशा सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आयुक्तांना दिल्या. शेतकऱ्यांना दिवसासुद्धा वीज मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळामध्ये सोलर पॅनल लावून सौर ऊर्जा निर्माण करण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरासाठी आवश्यक असणाऱ्या निधींची पूर्तता करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
0 Comments